Girls Don’t Want To Marry A Farmer: बाप स्वतः शेतकरी असून जावई ‘शहरातला’ का शोधतोय? ‘शेतकरी नवरा’ विषयाचा सडेतोड राडा! | Farmer issues, Shetkari Navra nako – sad and eye-opening side of Indian society – 2026

Girls Don't Want To Marry A Farmer

“रामराम मंडळी! कसं काय चाललंय सगळं? एकदम जोमात ना?”

आजचा विषय जरा गंभीर आहे (Girls Don’t Want To Marry A Farmer), काळजाला हात घालणारा आहे आणि सध्या गावाकडच्या चावडीवर सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आहे. विषय असा आहे की, “शेतकरी नवरा नको ग बाई!”

आज गावागावात फिरलात तर तुम्हाला एक चित्र दिसेल. अंगापिंडाने मजबूत, दिसायला राजबिंडा, हातात आयफोन आणि पायात बुलेट असलेला शेतकऱ्याचा पोरगा लग्नाच्या बाजारात मात्र पार ‘रिजेक्ट’ होतोय. एम.आय.डी.सी. मध्ये १५ हजाराची नोकरी करणाऱ्या पोराला पोरगी मिळते, पण बागायती जमीन असणाऱ्या ‘मालकाला’ पोरगी मिळणं कठीण झालंय. हा राडा नक्की काय आहे? पोरींना शेतकरी नवरा का नकोय? आणि यात बापाची काय चूक आहे? सगळं सविस्तर सांगतो, शेवटपर्यंत वाचा!

१. बापाची दुटप्पी भूमिका: “मी शेतकरी, पण जावई मात्र नोकरीवालाच पाहिजे!”

सगळ्यात मोठं आणि विदारक सत्य तर इथेच दडलंय. आपण म्हणतो पोरींना शेतकरी नवरा नको, पण खरं सांगू का? पोरीच्या बापालाच आधी शेतकरी जावई नको असतो.

ज्या बापाने आयुष्यभर मातीशी इमान राखलं, ज्याने काळ्या आईची सेवा करून पोरगी शिकवली, तोच बाप पोरगी मोठी झाली की लग्नाच्या बाजारात सगळ्यात आधी ‘नोकरी’ बघतो. तो म्हणतो, “आमची पोरगी खूप नाजूक आहे, तिला शेतात राबवायचं नाही, तिला शहरात सुखात ठेवायचंय.” म्हणजे स्वतः शेतकरी असून आपल्या पोरीला दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरी द्यायला हा बाप तयार नाही. त्याला भीती वाटते की, जे हाल मी सोसले, जे ऊन-पाऊस मी पाहिलं, जी पैशाची ओढाताण मी अनुभवली, ती माझ्या पोरीच्या वाट्याला नको.

पण मंडळी, विचार करा, जर शेतकरीच शेतकऱ्याला नाकारायला लागला, तर जगाचा पोशिंदा असलेल्या या पोरांनी जायचं कुणाकडं? हा बाप विसरतो की, ज्या रानात तो स्वतः मालक आहे, तिथे त्याची पोरगी ‘मालकीण’ म्हणून नांदेल. पण शहरात गेल्यावर ती फक्त एका भाड्याच्या खोलीतली ‘रांधा वाढा उरका’ करणारी बाई बनेल. ही दुटप्पी मानसिकता आज ग्रामीण संस्कृतीच्या मुळावर येतेय.

२. शहरातलं ‘चकचकीत’ मरण आणि गावाकडचं ‘ऐश्वर्य’

आता मुद्दा येतो शहराचा. पोरींना वाटतं शहरात गेलं की आयुष्य सेट झालं. पण वास्तव काय आहे? एकदा डोळे उघडून बघा.

शहरातली ती १० बाय १० च्या खोली, खिडकी उघडली की समोर दुसऱ्याच्या घराची भिंत आणि श्वासाश्वासाला गाड्यांचा धूर! सकाळी साडेपाचला अलार्म वाजल्यापासून नळाच्या पाण्यासारखं धावायचं, लोकलच्या किंवा बसच्या गर्दीत चेंदामेंदा व्हायचं आणि रात्री नऊ-दहाला थकल्या भागल्या घरी येऊन त्याच चार भिंतीत डोकं टेकवायचं. याला म्हणतात का सुख? शहरात तुम्ही पाणी विकत पिता, दूध भेसळयुक्त पिता आणि भाजी तर केव्हाची तोडून फ्रीजमध्ये ठेवलेली असते.

या उलट गावाकडे बघा. १०-२० एकर रान असणाऱ्या माणसाच्या घरात दूध-दुभत्याची रेलचेल असते. शुद्ध हवा, हक्काचं मोठं घर आणि रानातून तोडून आणलेली ताजी भाजी. शहरात तुम्ही ‘ऑरगॅनिक’च्या नावाखाली जे विष हजारो रुपये देऊन विकत घेता, ते शेतकऱ्याच्या पोराच्या अंगणात फुकट असतं. पण सध्याच्या चकचकीत दुनियेला वाड्यापेक्षा फ्लॅटचं कौतुक जास्त वाटतंय, हेच मोठं दुर्दैव! शहरात प्रतिष्ठा आहे असं लोकांना वाटतं, पण तिथे तुम्ही एका कंपन्यांच्या गुलामीमध्ये अडकलेले असता, तर गावात तुम्ही स्वतःच्या जमिनीचे राजे असता.

३. शेतीतील अनिश्चितता आणि व्यवस्थेचा मार

पोरी शेतकरी नवरा का नाकारतात, याचं एक ‘प्रॅक्टिकल’ कारण म्हणजे ‘पैशाची शाश्वती’. नोकरीवाल्याला १० तारखेला पगार पडतो, ही एक मानसिक शांती असते. शेतकऱ्याचं तसं नसतं. शेतकऱ्याचं उत्पन्न ‘लॉटरी’ सारखं झालंय. कधी अस्मानी संकट येतं, तर कधी सुलतानी!

कधी अवकाळी पाऊस सगळं पीक आडवं करतो, तर कधी सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. कधी कांदा ४० रुपये किलो होतो, तर कधी रस्यावर फेकावा लागतो. पोरींना भीती वाटते की, जर पीक गेलं तर संसार कसा चालवायचा? मुलाचं शिक्षण, आजारपण कसं निभवायचं? ही भीती चुकीची नाही, पण यावर उपाय ‘शेतकरी नाकारणे’ हा नसून ‘शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवणे’ हा आहे. पण सध्या लोक सोपा रस्ता निवडतायत—शेतकरी नवराच नको म्हणायचा! यामुळे शेतकरी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

४. शेती नको, माती नको… फक्त पगार हवा! पोरींच्या अटी आणि शेतकऱ्यांच्या पोरांची व्यथा?

शेतकऱ्याच्या पोराची अवस्था सध्या ‘त्रिशंकू’ झाली आहे. तो शहरात जाऊन १०-१५ हजाराची शिपाईगिरी करायला तयार नाही, कारण त्याला त्याची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते. आणि गावात राहिला तर त्याला कुणी पोरगी द्यायला तयार नाही. यामुळे आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘नवरदेवांचे मोर्चे’ निघायला लागलेत. ही चेष्टेची गोष्ट नाही, तर ही एक सामाजिक आणीबाणी आहे.

जर हीच परिस्थिती राहिली, तर विचार करा—उद्या शेती करायला कुणी उरणार नाही. तरुण मुलं शहराकडे पळाली की जमिनी पडीक राहतील किंवा त्या बिल्डरांच्या घशात जातील. जमिनी विकल्या गेल्या की तिथे सिमेंटची जंगलं उभी राहतील. मग जे आज ‘शेतकरी नवरा नको’ म्हणतायत, त्यांनी खायला काय सिमेंटच्या विटा वापरायच्या का? की मोबाइलच्या स्क्रीनवर पाहून पोट भरायचं? बळीराजा संपला की देशाचं पोट भरणारं साधन संपणार आहे, हे कुणीच का विचारात घेत नाही?

शेतकरी नवरा नको ग बाई
Girls Don’t Want To Marry A Farmer

५. शिक्षणाचा शाप की वरदान?

आजची पिढी शिकली, सवरली हे चांगलंच झालं. पण या शिक्षणाने काय दिलं? शिक्षणाने पोरांना शेतीचा तिरस्कार करायला शिकवलं. “जे शिकत नाहीत ते शेती करतात,” हा समज समाजात पक्का झालाय. एम.बी.ए., इंजिनिअर झालेला पोरगा शेतात उतरला की लोक त्याला टोमणे मारतात. “एवढं शिकून काय शेतात ढेकळं फोडायला आला का?”

अहो, उलट शिकलेल्या पोरांनी शेती करायला हवी! आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, प्रक्रिया उद्योग यात शिकलेली मुलं उतरली तरच शेती परवडणारी होईल. पण मुलींना वाटतं की शेतकरी मुलगा म्हणजे अनपढ किंवा गावंढळ असतो. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शेतकरी म्हणजे केवळ नांगरणारा माणूस नाही, तर तो एक नैसर्गिक शास्त्रज्ञ आहे.

६. सामाजिक दबावाचा फास (Girls Don’t Want To Marry A Farmer)

गावाकडच्या राजकारणाने आणि सामाजिक चढाओढीने विषय अजून बिघडवलाय. लग्न ठरवताना “मुलगा काय करतो?” यापेक्षा “मुलगा कुठे राहतो?” याला महत्त्व आलंय. मुलगा पुण्यात आयटी पार्कमध्ये पंधरा हजाराची नोकरी करत असेल तर त्याला मान, आणि तोच मुलगा गावात राहून लाखो रुपये कमवत असेल तरी त्याला ‘काय तर शेतीच करतोय’ म्हणून हिणवलं जातं.

या दबावामुळे अनेक शेतकरी मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत. ते शेती मनापासून करायला बघतात, पण समाज त्यांना प्रतिष्ठा देत नाही. मग नाईलाजास्तव ते जमीन विकून शहरात छोटी-मोठी कामं करायला जातात. हा स्थलांतराचा राक्षस ग्रामीण भागाला गिळंकृत करतोय.

७. आता बदलण्याची वेळ आली आहे!

मंडळी, आता वेळ आली आहे मानसिकता बदलण्याची. शेती हा फक्त उदरनिर्वाहाचा व्यवसाय नाही, ती आपली संस्कृती आहे, आपला अभिमान आहे. शहरातल्या गुलामीपेक्षा गावाकडची मालकी शंभर पटीने भारी आहे, हे आजच्या मुलींना आणि त्यांच्या आई-वडिलांना समजून घ्यायला हवं.

पण यात फक्त मुलींचीच चूक नाही. शेतकऱ्याच्या पोरांनी सुद्धा थोडं अपडेट व्हायला हवं. पारंपारिक शेतीला व्यावसायिक स्वरूप दिलं पाहिजे. स्वतःच्या राहणीमानात आणि बोलण्यात बदल केला पाहिजे. जर तुम्ही स्वतःला ‘बिझनेसमन’ म्हणून प्रेझेंट केलं, तर समोरच्याची बघायची नजर बदलेल. आधुनिक शेती, ऑनलाईन मार्केटिंग आणि शेतीपूरक जोडधंदे (उदा. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन) करून स्वतःचं उत्पन्न स्थिर कसं राहील, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

आणि पोरींना एकच सांगणं आहे—महिनाअखेर पगार संपल्यावर कर्ज काढून फिरावं लागणाऱ्या नोकरीवाल्यापेक्षा, अस्मानी संकटातही ताठ मानेने उभ्या राहणाऱ्या आणि जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याची साथ कधीही मोलाचीच ठरेल! जो संपूर्ण जगाचं पोट भरू शकतो, तो आपल्या बायकोला नक्कीच सुखात ठेवू शकतो, हा विश्वास ठेवा.

ब्लॉग च्या शेवटी काही गोष्टी नमूद कराव्या वाटतात ज्या आमच्या वाचक मित्रांनी आमच्यासोबत शेअर केल्या आहेत –

१) पालकांनी आपल्या मुलीला अनुरूप जोडीदार निवडत असतानी तो नोकरीवाला असो किंवा शेतकरी तो निर्व्यसनी आहे का तपासावे
काही सर्वेनुसार नोकरी करणाऱ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण जास्त आहे.

२) पालकांनी आपले मुलं शहरांमध्ये कुठे आणि कोणासोबत राहतात हे देखील तपासावे, हल्ली शहरांमध्ये लिव्ह इन राहण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे, कारण तुमचे मुलं-मुली नोकरीनिमित्त आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहेत त्यामुळे हे गरज नसलेले स्वातंत्र्य त्यांना मिळते.

३) ज्यावेळेस कोरोना आला आणि इतर काही आपत्ती आल्यात त्या वेळेस सगळ्यांना गाव आठवले परंतु जोडीदार मात्र गावाकडचा नको, आता सध्या इराण युद्धामुळे गॅसची कमतरता जाणवत आहे तर मनात सगळ्यांच्या आपलं गावच बरा हा विचार येऊन गेलाय हे नक्की.

४) स्वतःच्या जमिनीचा ‘मालक’ की दुसऱ्याचा ‘चाकर’?: शहरात कितीही मोठा पगार असला तरी शेवटी तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली गुलाम असता. पण शेतकऱ्याचा पोरगा हा त्याच्या जमिनीचा ‘राजा’ असतो. त्याला सुट्टीसाठी कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत. ही ‘मालकी’ मिळवण्यासाठी शहरात अख्खं आयुष्य जातं, जी शेतकऱ्याच्या पोराला वारशाने मिळालेली असते.

५) शुद्ध अन्नाची हमी आणि आरोग्य: शहरात तुम्ही जे काही खाता, त्यात भेसळ आणि पेस्टीसाईड्सचं प्रमाण भयानक आहे. शेतकरी नवरा असेल तर तुमच्या ताटात स्वतःच्या शेतातलं शुद्ध धान्य, घरचं ताजं दूध-तूप आणि रानभाज्या असतात. आजच्या काळात ‘आरोग्य’ हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती फक्त शेतकऱ्याच्या घरात मिळते.

६) संकटात लढण्याची जिद्द (Resilience): नोकरीवाल्याचं उत्पन्न थांबलं की तो खचून जातो, पण शेतकऱ्याचा पोरगा हा जन्मापासूनच निसर्गाशी लढत आलेला असतो. ऊन, वारा, पाऊस आणि पिकांचे चढ-उतार सहन केल्यामुळे त्याचं मन आणि शरीर दोन्ही लोखंडासारखं मजबूत असतं. आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी हा ‘हिरो’ डगमगत नाही.

७) स्वतःचं हक्काचं घर आणि मोकळी हवा: शहरात लोक आयुष्यभर लोन फेडून एक २-बीएचके फ्लॅट घेतात, ज्याला चारही बाजूंनी भिंती असतात. पण शेतकऱ्याच्या पोराचं घर म्हणजे वाडा असतो, ज्याच्या समोर अंगण आणि मागे विहीर असते. शहरातल्या गॅलरीपेक्षा शेतकऱ्याच्या पोराचं ‘शिवार’ लाख पटीने मोठं आणि हक्काचं असतं.

८) म्हातारपणीची सुरक्षितता (Social Security): खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी कधी जाईल याचा नेम नसतो. ४५-५० वय झालं की कंपनी बाहेरचा रस्ता दाखवते. पण शेती ही अशी गोष्ट आहे जी कधीच ‘रिटायर’ होत नाही. म्हातारपणी सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा ताठ मानेने आपल्या जमिनीत उभं राहून सन्मानाने जगू शकतो.

९) कौटुंबिक मूल्ये आणि नात्यांची जपणूक: शहरातल्या फ्लॅट संस्कृतीत शेजारी कोण राहतो हेही माहित नसतं. पण ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या पोराच्या मागे अख्खं गाव उभं असतं. सुख-दुःखात धावून येणारी माणसं हीच शेतकऱ्याची खरी श्रीमंती आहे. इथे नाती टिकवून ठेवली जातात, तोडली जात नाहीत.

१०) भविष्यातील महासत्ता – शेती: जगाची लोकसंख्या वाढतेय, पण जमीन तेवढीच आहे. येत्या काळात अन्नाची टंचाई निर्माण होणार आहे. अशा वेळी ज्याच्याकडे स्वतःची जमीन असेल, तोच खरा श्रीमंत ठरेल. त्यामुळे शेतकरी नवरा असणं ही ‘रिस्क’ नसून भविष्यातली सगळ्यात मोठी ‘इन्व्हेस्टमेंट’ आहे.

🏏 IPL 2026 सुरू! Full Schedule पाहिलंत का?

IPL 2026 चे complete schedule, पहिल्या 20 सामन्यांची यादी, टीम्स आणि match dates एका क्लिकमध्ये पाहा. तुमच्या आवडत्या टीमचा पहिला सामना कधी आहे ते अजिबात चुकवू नका!

👉 IPL बद्दल हे वाचून घ्या

तर मंडळी, हा होता आजचा गावरान राडा! तुम्हाला काय वाटतं? शेतकरी नवरा का नाकारला जातोय? तुमच्या भागात ही परिस्थिती आहे का? कमेंट मध्ये तुमची मतं नक्की मांडा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

शेती वाचवा, शेतकरी वाचवा!

जय जवान, जय किसान!

Author

Blogger Nitin

नमस्कार माझं नाव नितीन आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मला IT क्षेत्रात ६+ वर्षांचा अनुभव आहे. मी २०२३ पासून ब्लॉगिंग क्षेत्रात काम करायला सुरवात केली आहे. मी ट्रेंडिंग टॉपिक आणि फॅक्टस संबंधी content write करतो तसेच मी Freelancer म्हणून देखील काम करतो.

💰 सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण!

सोन्याच्या किंमतीत अचानक मोठी घसरण होण्याचे कारण काय? बाजारात नेमकं काय घडलं आणि पुढे किंमत वाढणार का — सविस्तर जाणून घ्या.

👉 जाणून घ्या पूर्ण माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top