MSRTC Problems: एसटीचा गजब कारभार: नगर वरून शिर्डी – राहुरीला जायचंय पुण्यावरून येणाऱ्या धुळे बसची वाट बघा, शिर्डी वरून संगमनेरला जायचंय धुळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या बसची वाट बघा… अहो साहेब लोकल बस सेवा गेली कुठे? एसटीच्या प्रवाशांचे हाल 2026

“गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी” हे वाचायला लै भारी वाटतं, पण (MSRTC Problems) नगर जिल्ह्याच्या बस स्टँडवर येऊन बघा, मग कळल लाल परीनं सामान्यांची कशी वाट लावलीया ती. खास करून नगर, कोपरगाव, शिर्डी अन् राहूरीच्या पट्ट्यात एसटीचा जो काय ‘गजब कारभार’ सुरू आहे, त्याला तर तोडच नाही!

१. नगर-शिर्डी प्रवास: धुळे-चोपड्याच्या भरवशावर !

नगरवरून शिर्डीला जायचं म्हणलं की माणसाला वाटतं पटकन गाडी भेटल. पण तिथं गेल्यावर कळतं की लोकल गाड्यांचा पत्ताच नाही. कंडक्टर ओरडत असतो, “धुळ्याची गाडी येतेय, चोपड्याची येतेय, त्यातच घुसा.” आता सांगा बरं, त्या लांब पल्ल्याच्या गाड्या आधीच मुंबई-पुण्यावरून माणसं गच्च भरून आलेल्या असत्यात. त्यात नगरच्या माणसांनी घुसायचं कुठं? पाय ठेवायला जागा नसते अन् हे अधिकारी म्हणतात त्याच गाड्यांची वाट पहा. राहूरीला जायचं असलं तरी तीच बोंब, कोपरगावला जायचं असलं तरी तीच बोंब!

नगर-शिर्डी प्रवास

२. शिर्डी ते संगमनेर: पुण्याच्या गाडीची ‘प्रतीक्षा’

शिर्डीहून संगमनेरला जायचं म्हणलं की तिथं पण हेच नाटक. “पुण्याची गाडी येईल तेव्हा बघा,” असं उत्तर मिळतं. एसटी प्रशासनाने असा काही अजब ‘ताळमेळ’ लावलाय की प्रवाशांना नेमकं कुठल्या गाडीत बसावं हेच समजेना. स्वतःच्या जिल्ह्याची गाडी वेळेवर सुटत नाही अन् दुसऱ्या डेपोच्या गाड्यांवर हे लोकं विसंबून राहतात.

३. आयटी इंजिनिअरचा किस्सा अन् गळणारी ‘लाल परी’

नुकताच एक लय भारी किस्सा घडला. एका सुशिक्षित आयटी इंजिनिअर पोरानं शिर्डीहून पुण्याला जाताना पाहिलं की भर पावसात अख्खी बस आतून गळतीया. प्रवासी भिजत होते, सामान ओलं होत होतं. त्या पोराला राहवलं नाही, त्यानं ऑनलाईन तक्रार ठोकली. आता प्रशासनानं काय करायला पायजे होतं? गाडी दुरुस्त करायला पायजे होती. पण इथं तर उलटीच गंगा वाहिली! त्या आगार प्रमुखांनी चक्क बसच्या ड्रायव्हर अन् कंडक्टरलाच झापलं. वरून काय म्हणले माहितीये का? “तुम्हीच त्या पोराला नाद लावला असणार तक्रार करायला, तुम्हीच त्याला शिकवलंय!” म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! गाडी गळतीये ही चूक सुधारायचं सोडून, तक्रार का केली म्हणून कर्मचाऱयांना वेठीस धरलं आणि त्यानंतर ती शिर्डी-पुणे (संगमनेर मार्गे दुपारी ३.३० वाजता जाणारी बस कायमची बंद करून टाकली).

४. पुणेकर चाकरमान्यांची ‘शुक्रवारी’ होणारी दैना

पुण्याला आयटीत काम करणारे लय पोरं शुक्रवारी संध्याकाळी गावाकडे धाव घेतात. ऑफिस ६ ला सुटतं, कसाबसा धावतपळत ६:३० ची नगरची गाडी पकडतात. नगरच्या तारकपूर बस स्टँडवर रात्री ९:३० ला हे पोरं पोहोचतात. तिथं गेल्यावर बघतात तर काय? आधीच राहूरी, कोपरगावचे २०-३० जण डोळ्यात तेल घालून गाडीची वाट बघत बसलेले असत्यात. ९:३० पासून ११:०० झाली तरी एकाही लोकल गाडीचा पत्ता नसतो.

How to complain online

५. ११ वाजताचा राडा अन् दोन तासांचा वनवास

रात्री ११ वाजता जेव्हा धुळे, चोपडा किंवा नंदुरबारची गाडी येते, तेव्हा ती आधीच तुडूंब भरलेली असते. नगरच्या स्टँडवर उभे असलेले ३०-४० लोक त्या एका गाडीत घुसायला बघतात. जेमतेम ४-५ पोरं कशीबशी आत घुसतात, बाकीचे तसेच उभे! विचार करा, ६ ला पुण्याहून निघालेला माणूस नगरमध्येच २ तास सडतोय. तो कोपरगावला पोहोचायला पहाटेचे २ वाजतात. हे काय एकदा झालं तर समजू शकतं, पण हे तर रोजचंच रडगाणं झालंय. दोन-दोन तास स्टँडवर उभं राहून सामान्य माणसाचं खोळंबा होतोय, त्याला कुणी वालीच राहिला नाही का?

६. प्रशासनाला हात जोडून विनंती (msrtc problems)

जर अधिकारी आणि राजकारणी यांच्या मनात असलं तर हे प्रश्न सुटू शकतात:

रात्री लोकल फेऱ्या: रात्री ९ नंतर प्रवाशी बघून शहनिशा करून नगर ते कोपरगाव किंवा शिर्डी अशी किमान 1-2 साध्या गाड्या सुरू करा.

शिवाई इलेक्ट्रिक : तारकपूरला रात्री १०-१५ ‘शिवाई‘ गाड्या पार्किंगमध्ये नुसत्याच उभ्या असतात. त्या गाड्या कोपरगावपर्यंत ‘शॉर्ट ट्रिप’ म्हणून का सोडत नाही? इथं माणसं ताटकळत उभी आहेत अन् तिथं गाड्या रिकाम्या उभ्या आहेत, काय पटतंय का साहेब तुम्हाला?

त्या चार्जिंगला लावलेल्या ‘शिवाई’ गरज असतांना सामान्य प्रवाशांच्या काय कामाच्या?

आता हे नवं खूळ बघा—‘शिवाई’ इलेकट्रीक बस! दिसायला चकचकीत, आवाज नाही, प्रदूषण नाही, सगळं कसं एकदम ‘डिजिटल’ हाय. पण तारकपूरला गेलं की कळतं, या गाड्या रात्री नऊ-साडे नऊलाच चार्जिंगच्या खुंट्याला बांधून घातल्या जात्यात. कशासाठी? तर म्हणे उद्या सकाळी पुण्याला किंवा नाशिकला लांबच्या पल्ल्यावर सोडायच्यात.

अरे वा रे तुमचा कारभार! इथं समोर कोपरगाव, राहूरीला जायला २०-३० प्रवाशांचा तांडा उभा हाय, त्यांचे पाय थकून गेलेत, अन् तुमच्या शिवाई गाड्या तिथं पार्किंगमध्ये निवांत ‘विश्रांती’ घेत बसल्यात. जर त्या गाड्या ९ ला तिथं पोहोचत्यात, तर एखादी खेप कोपरगावपर्यंत मारून यायला काय हरकत हाय? कोपरगावला पण चार्जिंगची सोय होऊ शकती किंवा गाडी परत येऊन चार्ज होऊ शकती. पण नाही, ‘साहेबांचा’ नियम हाय की गाडी सकाळीच सुटणार. म्हणजे माणसं स्टँडवर सडू द्या, पण आमची इलेकट्रीक गाडी हलणार नाही!

ज्याला आपण ‘नियोजन’ म्हणतो ना, त्याचा एसटी प्रशासनाशी काडीचाही संबंध उरलेला दिसत नाही. रात्री ९ ते ११ हा असा वेळ हाय की पुण्यावरून येणारा प्रत्येक चाकरमानी नगरमध्ये अडकतो. तिथं जर तुम्ही शिवाई किंवा साध्या बसच्या ‘शॉर्ट ट्रिप’ लावल्या ना, तर एसटीला गडगंज पैसा मिळेल. पण या अधिकाऱ्यांना एसी केबिनमधून बाहेर येऊन ही गर्दी बघायला वेळ कुठं हाय?

एकीकडे म्हणायचं ‘प्रदूषण टाळा, एसटीने प्रवास करा’ अन् दुसरीकडे प्रवाशांना रात्री-अपरात्री दोन-दोन तास ताटकळत ठेवायचं. मग तो प्रवासी काय करणार? वैतागून एखादी खाजगी वडाप किंवा ट्रॅव्हल्स बघणार. मग बोंबलत बसायचं की एसटी तोट्यात चाललीया.

शेवटचा सवाल: कोपरगावचा रस्ता काय लांब हाय का?

नगर ते कोपरगाव किंवा राहूरी काय सात समुद्र पार करून जावं लागतंय का? रस्ता चांगला हाय, प्रवासी भरपूर आहेत, तरीही रात्री ९ नंतर तिथं ‘स्मशानशांतता’ असती. शिवाई गाड्या चार्जिंगला लावून फुशारक्या मारण्यापेक्षा, त्या बॅटरीचा वापर लोकांच्या सेवेसाठी करा. जर रात्री एखादी जादा बस सोडली, तर त्या चाकरमानी प्रवाशांना रात्री २ ऐवजी ११-११:३० ला घरी पोहोचता येईल. तिथे बऱ्याच महिला प्रवाशी देखील असतात त्यांचा आशीर्वाद मिळेल साहेब तुम्हाला त्या तोंड भरून कौतुक करतील आपल्या लाल परीच

त्या आयटी इंजिनिअर पोराचं काय चुकलं? बसमध्ये पावसाचं पाणी थेट प्रवाशांच्या डोक्यावर पडत होतं. आता तुम्हीच सांगा, तिकीट काढायचं, पूर्ण पैसे भरायचे अन् वरून बसमध्ये छत्री धरून बसायचं? हे कुठलं लॉजिक? जेव्हा त्या पोराने ऑनलाईन तक्रार केली, तेव्हा त्याला वाटलं असेल की पुढच्या वेळी नवीन बस येईल. पण इथं तर प्रशासनानं कहरच केला. ड्रायव्हर-कंडक्टरला दोषी धरलं. अरे, गाडीचे पत्रे काय ड्रायव्हरने फाडलेत का? का कंडक्टरने बादलीने पाणी आत ओतलंय?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवं की, जो माणूस तक्रार करतोय तो एसटीचा शत्रू नाही, तर तो एसटीवर प्रेम करणारा प्रवासी आहे. जर सेवा चांगली दिली ना, तर लोकं आपोआप खासगी ट्रॅव्हल्स सोडून इकडे येतील. पण जर तुम्ही तक्रार करणाऱ्यालाच आरोपी ठरवणार असाल, तर मग ‘लाल परी’ फक्त नावापुरतीच उरेल.

शुक्रवारी जो काय राडा असतो ना, तो फक्त अनुभवलेलाच सांगू शकतो. पुण्याच्या हडपसर किंवा शिवाजीनगरला उभं राहून नगरची गाडी पकडणं म्हणजे जणू काही युद्ध जिंकण्यासारखं असतं. ६:३० ला गाडीत बसलं की वाटतं, चला आता लवकर घरी पोहोचू. पण खरी परीक्षा असते नगरच्या तारकपूरमध्ये.

तिथं ९:३० ला उतरल्यावर प्रवाशाचे डोळे फक्त त्या पाटीकडे असतात— ‘नगर-कोपरगाव’ किंवा ‘नगर-शिर्डी’. पण तिथं पाटी तर सोडाच, नुसता धुरळा उडत असतो. मग कोपऱ्यात उभा राहिलेला एखादा म्हातारा सांगतो, “आता काय गाडी नाय बाबा, आता थेट धुळ्याची गाडी येईन तासाभराने.” तो चाकरमानी मुलगा विचार करतो, “आई वाट बघत असेल, घरी फोन करून काय सांगू? गाडीच नाहीये.” रात्री ११ वाजेपर्यंत स्टँडवर उभं राहून पाय दुखायला लागतात, भूक लागलेली असते, पण एसटीच्या या ‘गजब कारभारा’मुळे सगळा उत्साह मातीत मिळतो.

तक्रार कुठं करायची? (How to complain online):

नुसतं बोलून उपयोग नाही, या गाडं हलवायला तक्रार करावीच लागल:

१. MSRTC Mobile App: प्ले स्टोअरवरून ॲप घ्या, तिथं ‘Grievance’ मध्ये जाऊन फोटोसकट तक्रार टाका (गळणाऱ्या बसचे फोटो तर नक्की टाका).
२. MSRTC Website: msrtc.maharashtra.gov.in वर ‘Public Grievance’ शोधून तिथं आपली कैफियत मांडा.
३. टोल-फ्री नंबर: १८०० २२ १२५० यावर फोन लावून अधिकाऱ्यांना जागे करा.
४. Twitter (X): तुमची तक्रार लिहून @msrtccorp ला टॅग करा. सोशल मीडियावर जाहिरात झाली की हे लगेच कामाला लागतात.
५. Email: msrtchelpdesk@gmail.com वर सविस्तर लिहून पाठवा.

भाऊ, गप्प बसून चालणार नाही, जोपर्यंत आपण ओरडणार नाही तोपर्यंत या साहेबांना जाग येणार नाही!

Disclaimer

“राम राम पाव्हणं! हे बघा, वर जे काय लिहिलंय ते आरसा दाखवण्याचं काम केलंय. कुणा अधिकाऱ्याच्या काळजाला लागलं तर समजावं की औषध बरोबर टोचलंय. एसटी काय कोणाची खासगी मालमत्ता नाही, ती जनतेची हाय. सुधारणा केली तर लोकं तोंडभरून स्तुती करतील, नाय तर खाजगी गाड्या वाले खिसे कापतच आहेत लोकांचे. लेख वाचून कुणाला मिरच्या झोंबल्या, तर खुशाल झोंबू द्या, आमी खरं बोलायचं काय सोडणार नाही!”

Author

Blogger Nitin

नमस्कार माझं नाव नितीन आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मला IT क्षेत्रात ६+ वर्षांचा अनुभव आहे. मी २०२३ पासून ब्लॉगिंग क्षेत्रात काम करायला सुरवात केली आहे. मी ट्रेंडिंग टॉपिक आणि फॅक्टस संबंधी content write करतो तसेच मी Freelancer म्हणून देखील काम करतो.सद्धया Cyber Law शिकत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top